Monday, December 2, 2013

वचन शेवटचे आज निरोप घेताना… !

आज कित्येक तरुण काही कारणास्तव घरापासुनी दुरावतात , नोकरी किवा अनेक कारणा निमित्त. तशाच एका तरुणाचे वचन त्याच्या आई - वडील अन भावासाठी , एक ध्येय काहीतरी करुनी दाखविण्यासाठी..!
 --------------------------------------------------------------------------------------------------
आज घराबाहेर जाता जाता
दुराव्याचे अश्रू नयानि दाटले
जगलो अठ्ठावीस वर्षे या घरात
जीवनाचे बाळकडू इथेच होते घेतले....

हसणे-रडणे ,  आनंद - दुख
यशा- अपयशाचे येथे धडे गिरविले होते
त्या मातृ - पिताच्या छायेखाली मी
सारे काही अनुभवले होते ....

भांडलो मी, तुम्हासी रडवले मी
दुखाचे चटके तुम्हास दिले मी
अपयशाच्या या खडतर प्रवासात
तुम्हास सदा तोडले मी....

जाणत होतो दुख तुमचे
हताश मन माझे हि होते
करुनी पराकाष्टा प्रयत्नांची सदा
नैराश्य पदरी पडत होते ....

तुम्ही ढळलेली हर एक आसवे
स्वप्नात हि मी भुलवणार नाही
वाहतील सुखाचे वारे पुन्हा
प्रयत्नास आता मी थकणार नाही....

दुरावत असलो आज जरी मी
सुखाचे स्वप्न उरी बाळगत आहे
खिलवायचे हास्य तुमच्या ओठी पुन्हा
अबोल मनाची हि आशा आहे ....

ना बोलू शकलो तुम्हासी कधी
आज काव्यातुनी माफी मागत आहे
आहे तुमचाच आभिमान मी सदा
लढा देण्यास आज सज्ज होत आहे ....

आहेत पाणावले डोळे माझे
तुम्हपासुनी आज दूर जाताना
बनीन पाया या घराचा मी
वचन शेवटचे आज निरोप घेताना… वचन शेवटचे आज निरोप घेताना…!
---------------शिरीष सप्रे (२५ - ११- २०१३)---------------------------------

आई - ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे…

आई ए आई म्हणुनी या
इवलाश्या ओठी शब्द स्फुरले
तुझ्याच मायेच्या पंखाखाली
जीवनाचे धडे मी गिरविले..

स्वताच्या सुखासी भुलवुनि
आम्हा सुखात सदा ठेवले
झळ दुखाची स्वत सोसली सदा
सुखाच्या वर्षांनी आम्हा भिजविले ..

सुख दुखाची, यशा अपयशाची
अनेक पर्वे तू सदा सोसली
उपवास - प्रार्थना करुनी देवाकडे
आमुच्या सुखाची याचना केली ..

पाहतो थकवा आज आम्ही
तुझ्या या थकलेल्या डोळ्यात
आजही आसुसले आहेत नयन तुझे
आम्हास सदा सुखी पाहण्यात ..

न बोलू शकलो तुझ्याशी कधी
आज कवितेतुनी मांडत आहे
जागलो आहेत तुझ्या कष्टांना आम्ही
तुझ्या नयनी आनंद पहायचा आहे..

सुखावतील नयन तुझे आई
वचन आमुचे तुजसी आहे
आत्मा अन ईश्वर या मेळीत
सुखे सारी तुझ्या चरणी आहे ..

आहे खुप लिहायचे आजही
शब्द तुजसाठी अपुरे आहे
उदंड आयुष्य लाभो या माउलीस
ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे… ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे…
-------------शिरीष सप्रे (२-१२-२०१२)-------------------------