Monday, July 29, 2013

कोण होतास तू....काय झालास तू …

आठव तो दिवस तू आज
लेखणीस तुझा प्रथम स्पर्श होता
अबोल मनातील शब्दांना तेव्हा
काव्यात गुंतायचा प्रथम प्रयत्न होता …

चुकलास तेव्हा तू
खचलास तेव्हा तू
करुनी दृढ निश्चय मनाशी
पुन्हा लढलास तू …

संकटे आजवर अनेक अशी
या उभ्या आयुष्यात आली
आठव तो काळ तू जेव्हा
त्यावरी हसत मात तू केली …

खरा योद्धा बनुनी तू सदा
संकटाना सामोरे जात राहिला
पहा आज स्वताकडे तू आज
का असा एका नैराश्यात तू हरला …

आहे दुख जवापाडे म्हणुनी तू
त्यावरी मात तू करत आलास
आज यशाच्या उंबरठ्यावरी असताना
का सारी हिम्मत तू असा हरलास …

नवी स्वप्ने, नव्या कल्पनांच्या जागी
नैराश्याची घरे तू बांधलीस
ना ओळखले स्वतासी तू अजूनही
इच्छा मनाची अलगद तू मारलीस …

खरा योद्धा म्हणुनी तू
सर्वांसामोरी आदर्श तू होतास
एका अपयशाशी खचुनि तू
आज स्वतापासुनी दुरावत होतास…

वाटते खंत आज या मनास
एकेकाळी कोण होतास तू
पहा आज स्वतासी तू आरशात
आज काय झालास तू …

आहे बाहूत बळ तुझ्या आजही
त्यांसी यशाचे धडे आज पुन्हा गिरवू दे 
घे भरारी या गगनी पुन्हा एकदा
समंत आसमांत तुझ्या नावाने गुंजू दे …

सलेल हि वेळही हळुवार
हिम्मत ती ध्यानी मनी ठेव
वाहतील सौख्याचे ते वारे
विश्वास स्वतावरी तू ठेव … विश्वास स्वतावरी तू ठेव …
--------------शिरीष सप्रे (२९ - ०७ - २०१३)-----------------

Wednesday, July 10, 2013

बेधुंद होऊनी ते बरसणार .....

पावसाची ती सर आज जणू
आपल्याच  धुंदीत बरसत होति
चिंब भिजवुनी सर्वांस आज ती
वातावरण जणू हर्षवीत होति…

बेधुंद पावसाची सर पाहताना
मनी एक विचार चटका लावूनी गेला
होता बेधुंद तू हि असा कोण्या काळी
का असा अचानक  हरवलेला...

शब्दांसी काव्यात गुंफणे हे
जणू तुझे  जीवन होते
कोणता काळ ओढवला होता असा
आज शब्द सारे तुझे हरवले होते…

संवाद तुझ्या  मुक्या मनाचा
काव्यरुपात सदा असायचा
अबोल करुनी काव्यास आज असे  
भाव मनीचा कसा व्यक्त करायचा...

थैमान घातलेल्या मनातील प्रश्नांनी
तूझ्याच शब्दांपासुनी तूजला दूर लोटले
न कळले त्या  मनासही कधी तुझ्या 
अंतर त्या शब्दांपासुनी होते किती वाढले ….

आहे त्या मुक्या मनासही आज
शब्दरूपी काव्यात गुंफायचे
जाणते तुझी व्यथा सारी ते
तुझ्याच काव्यात आहे त्यासी रंगायचे...

हो तू हि बेधुंद आज
या पावसाच्या सरी बरोबर
चिंब भिजव काव्यांनी तुझ्या
ना विचार करू तू क्षणभर...

तुझेच शब्द सारे हे
तुझीच बोली ओळखणार
आसुसलेले आहे तुझ्या साथीसाठी
तुझ्याच काव्यात बेधुंद होऊनी ते बरसणार ..... बेधुंद होऊनी ते बरसणार .....
--------------------शिरीष सप्रे (१० -०७-२०१३ )------------------------------

Thursday, March 21, 2013

तळ हातावरती मी जपीन....!

गोष्टी प्रेमाच्या अनेक अशा,
अनेकदा पहिल्या अन ऐकल्या होत्या,
रंगी -बेरंगी प्रेमाच्या दुनियेत, 
या हृदयास ही रंग प्रेमाचा भरायचा होता...

अबोल प्रीत प्रेमाची ही
हृदयास या समजत होती,
देईल का साथ या हृदयासी कोण,
आस या वेड्या मनास होती...

मुक्या हृदयाच्या हाकेस या
साद तुझ्या हृदयाची मिळाली,
कळत-नकळत  या वेड्या मनाने,
प्रीत प्रेमाची काव्यात गुंफली...

आयुष्याच्या या नव्या पर्वाची
 सुरुवात तुझ्या साथेने होत आहे,
निरागस कोमल हास्य तुझे
सदा खिलत ठेवीन, वचन हे तुजसी आहे...

न मोजता अन मापता येणारे
प्रेम हे माझे कमी होणार नाही,
रंगी बेरंगी प्रेमाच्या दुनियेतील
माझ्या प्रेमाचा रंग फिका होणार नाही...

हाथात धरुनी हाथ सदा
आयुष्याच्या प्रत्येक पावोली साथ असेल ,
ना तुटेल साथ अन हाथ कधीही
येणाऱ्या संकटा सामोरी, उभा मी असेल...

विश्वास अन प्रेमाचे हे अतूट नाते
प्रत्येक क्षणी सदा मी राखीन,
आहे वचन पहिले आज तुजसी
शीतल हास्य शीतल तुझे, तळ हाता वरती मी जपीन....!
---------------शिरीष सप्रे(१८-०३-२०१३)------------------

Tuesday, January 22, 2013

तुमच्याच बाप्पा सोबत आहे...

वार्याची ती झुळूक आज
हास्य ओठी खिलावूनी गेली..
अधीर लेखणी माझी आज
चित्र तिचे रेखाटुनि  गेली...

आठवला तो पहिला संवाद
दबकतच  आपुल्यात झाला होता..
तुटक्या शब्दांच्या संवादात
स्वरांचा मात्र मेळ जुळला होता...

अनामिक नाते आपुले असे
सहजरीत्या जुळले होते
मनातील भावनांच्या घरात
शब्दांचे सारे वास्तव्य होते...

चंद्राची ती ईर्ष्या पाहुनी
मन माझे सदा हसायचे ..
चंद्रकोरीहुनी मोहक असे
हास्य  तुझ्या ओठी खिलायचे...

सुरुवात अन शेवट दिवसाची
अनामिक त्या नात्याने असायची ..
शीतल चांदण्या रात्रीत अन
प्रेमाच्या रंगांची उधळण व्हायची..

मुक्या मनाच्या अबोल भावना
बाप्पाशी सारे तू सांगायची
संवाद त्या बाप्पाशी पाहुनी,आम्हास  
बाप्पा बनायची इच्छा व्हायची...

निराळे रस्ते त्या अनामिक नात्याचे
काही काळासाठी भुलवले होते
जाउनी नियतीच्या निर्णया पलीकडे
 लढा देण्याचे साहस केले होते...

असलो दुरावलो आम्ही जरी
मनातील जागा तुमचीच आहे
नांदतील सुखे चरणी तुमच्या 
तुमच्याच बाप्पा सोबत आहे... तुमच्याच बाप्पा सोबत आहे...!
------------शिरीष सप्रे(२२-०१-२०१३)------------------------

Tuesday, July 17, 2012

अंत त्या कवीचा तू करू नकोस...

लिखाणास लेखणी सज्ज होती
पाने वहीची फडफडत होती..
मनात काहूर अनेक विचारांचे
शब्दासी मात्र जाग येत नव्हती...

कोड्यात पडले मन वेडे माझे
ना विचारांचे उलगडले कोडे
लिहिण्यास आज मजपाशी 
ना उरले होते शब्द मजकडे...

क्रोधीत हे मन माझे 
स्वताशीच आज भांडू लागले
कामाच्या या ओघापायी 
का शब्द तू माझे हिरावले...

उतार-चढाव आयुष्यातील 
सहज रित्या पार पाडत गेलास
ना पहिले कधी मागे वळूनी तू
पण या शब्दां पासून तू दुरावालास...

होते तुझेच शब्द सारे वेड्या 
तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे
ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे 
शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे...

सहज शब्दांसी गुंफणारा तू 
स्वताच आज तू हरवलास
जन्म घेतला होता कवीने त्या
अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

आहेत तुझेच शब्द अजूनही सारे
त्यांच्या पासुनी तू दुरावू नकोस
आहे जिवंत कवी तुझ्यातला आजही 
अंत त्या कवीचा तू करू नकोस...अंत तू करू नकोस...
------------शिरीष सप्रे(१७-७-२०१२)----------------