Tuesday, July 17, 2012

अंत त्या कवीचा तू करू नकोस...

लिखाणास लेखणी सज्ज होती
पाने वहीची फडफडत होती..
मनात काहूर अनेक विचारांचे
शब्दासी मात्र जाग येत नव्हती...

कोड्यात पडले मन वेडे माझे
ना विचारांचे उलगडले कोडे
लिहिण्यास आज मजपाशी 
ना उरले होते शब्द मजकडे...

क्रोधीत हे मन माझे 
स्वताशीच आज भांडू लागले
कामाच्या या ओघापायी 
का शब्द तू माझे हिरावले...

उतार-चढाव आयुष्यातील 
सहज रित्या पार पाडत गेलास
ना पहिले कधी मागे वळूनी तू
पण या शब्दां पासून तू दुरावालास...

होते तुझेच शब्द सारे वेड्या 
तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे
ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे 
शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे...

सहज शब्दांसी गुंफणारा तू 
स्वताच आज तू हरवलास
जन्म घेतला होता कवीने त्या
अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

आहेत तुझेच शब्द अजूनही सारे
त्यांच्या पासुनी तू दुरावू नकोस
आहे जिवंत कवी तुझ्यातला आजही 
अंत त्या कवीचा तू करू नकोस...अंत तू करू नकोस...
------------शिरीष सप्रे(१७-७-२०१२)----------------

Monday, April 16, 2012

कवितेत आज रंगले होते....

तासा भराचा प्रवास आज
काळा सारखा वाटत होता
घड्याळातील सेकंद काटाही
तासा तासा ने सरकत होता...

अनोळख्या भेटीसाठी ओढ ती
वेड्या मनास आतुरतेने होती
असंख्य विचारांचे जाळे मनात तरीही
हास्याची कळी ओठी खिलत होती...

दरवाजाची बेल वाजवता तिच्या
स्पंदने हृदयाची वाढली होती
उत्सुकता तिच्या भेटीची एकीकडे
अन निराशा चेहर्यावरी दिसत होती...

कवडस्यातुनी येणाऱ्या सोनेरी किरणांपेक्षा
शीतल चांदण्या सारखे कोमल हास्य तिचे
नजर खिळली होती त्या चंद्र मुखावरी
सैर भैर धावणारे मन झाले होते वेडेपिसे...

पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट
अनेकदा कानावरी आली होती
विश्वास बसला होता कथेवरी त्या
माझ्याही कथेची सुरुवात आज होती...

औपचारिक बोलणे सुरु झाले होते
नयन मात्र त्या हस्यावारी खिळले होते
संभाषणातील बोल इतके रंगत होते
वेडे हृदय मात्र तिच्याच विचारात होते...

उभ्या आयुष्यासाठीचा तो निकाल
त्या तीन तासात शक्य नव्हता
एक मेकास जाणून घेण्यास त्यांना
तो दिवस ही आज पुरेसा नव्हता...

दोन वेगळे रस्ते दोघांचे ते
एकत्र आज होणार नव्हते
त्या कवितेसाठी शब्द मात्र
त्या कवितेत आज रंगले होते...कवितेत आज रंगले होते....
------------शिरीष सप्रे(१६-४-२०१२)-------------------


Monday, January 30, 2012

फोटो मधुनी मी ही रडत होतो..

दिवसाची सुरुवात उशिरा झाली
सकाळची आज दुपार झाली
आईसही हाक मारुनी झाली
आईने हाकेस ओ ही न दिली...

डोळ्यात तिच्या पाणी होते
अश्रू घळा घळा वाहत होते
हजार प्रश्न विचारले तिला
एकही प्रश्नास तिने ऐकले नव्हते...

भावाला विचारण्यास मी धावलो
त्या अश्रुनी मी होतो दुखावलो
अनेक प्रश्न त्याला ही विचारले
एका प्रश्नालाही त्याने न उत्तरले...

वडील ही अश्रू लपवत होते
कठोर मनास धीर देत होते
दुख त्यांसी सतावत होते
मनोबल त्यांचे ही खचले होते...

हताश मी उतारांच्या शोधात
न उलगडलेल्या कोड्याच्या उत्तरात...
.
.
अचानक नजर भिंतीवर गेली
फुलांच्या हारांनी सजवलेली
माझीच फोटो फ्रेम मजला दिसली...
.
.
अश्रुंचे त्यांचे कारण समजले
न उलगडलेले कोडे सुटले
दोन दिवसापूर्वी चे क्षण होते
अन आज मात्र जीवनच संपले...

कोणत्या गुन्ह्याची ती शिक्षा होती
अनेक जबाबदारी उचलली होती
वेळेशी अलिखित शर्यत अशी होती
समाप्त आधीच, सांगता माझी होती...
.
.
नजरेने सारे मी पाहत होतो
वाटूनही अश्रू पुसू शकत नव्हतो
अधुर्या स्वप्नांसाठी भटकत होतो
आज फोटो मधुनी मी ही रडत होतो..फोटो मधुनी मी ही रडत होतो..
--------शिरीष सप्रे(३०-१-२०१२)---------------